दितवाह चक्रीवादळ ; श्रीलंका ते महाराष्ट्र, भारताला मोठा परिणाम.
श्रीलंकेत मोठे थैमान घातलेल्या ‘दितवा’ (Ditwa) या चक्रीवादळामुळे आता भारताच्या पूर्व किनाऱ्यावरती मोठी धडकी भरली आहे. श्रीलंकेच्या किनाऱ्यावरून हे वादळ थेट भारताकडे सरकल्यामुळे आंध्रप्रदेश आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीला मोठा तडाखा बसला आहे. केवळ पूर्व किनाराच नाही, तर या चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या हवामानामध्ये देखील मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. दितवा चक्रीवादळाच्या नावाने श्रीलंका, इंडोनेशिया, व्हिएतनाम, थायलंड आणि मलेशियासह अनेक देशांमध्ये मोठे नुकसान झाले आहे.
या चक्रीवादळाचा सर्वात गंभीर परिणाम श्रीलंकेत दिसून आला. दितवामुळे तिथे पूर आणि भूस्खलन होऊन 150 हून अधिक सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला, तर अजूनही 200 पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत. या भीषण संकटाच्या पार्श्वभूमीवर, भारताने श्रीलंकेच्या मदतीसाठी ‘ऑपरेशन सागर सिंधू’ सुरू केले, ज्या अंतर्गत भारतीय वायुसेनेच्या विमानाने कोलंबो येथे सुमारे 27 टन मदत सामग्री पोहोचवली. भारताने आपल्या शेजारील राष्ट्राला मदतीचा हात दिला असला तरी, आता हेच वादळ भारतीय प्रशासनासमोर आव्हान उभे करत आहे.
श्रीलंकेनंतर हे वादळ तमिळनाडू आणि पॉडिचेरीच्या किनाऱ्यावर धडकले असून, कुड्डाल, नागपट्टीनम, महिला दुथुराई यासह अनेक परिसरांमध्ये पुढील काही दिवस मुसळधार पावसाचे असणार आहेत. सुरुवातीला श्रीलंकेत मोठी हानी घडवून आणल्यानंतर, या चक्रीवादळाचा प्रवास आता तमिळनाडूला समांतर असा उत्तर दिशेने होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या वादळाची तीव्रता कमी होऊन त्याचे ‘डीप डिप्रेशन’ मध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे.
पूर्व किनारपट्टीवर मदत आणि बचाव कार्यासाठी प्रशासनाने तातडीने पाऊले उचलली आहेत. तमिळनाडूच्या किनारी जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफ (NDRF) आणि एसडीआरएफ (SDRF) ची 28 हून अधिक आपत्कालीन पथके तैनात करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रासह गुजरात मधील पश्चिम किनारपट्टीवरील पथके देखील पूर्व किनारपट्टीच्या मदतीसाठी पोहोचली आहेत. या वादळामुळे अनेक सेवांमध्ये व्यत्यय आला. तमिळनाडूमध्ये पावसामुळे अनेक विमानांची उड्डाणे रद्द झाली, परिणामी कोलंबो विमानतळावर शेकडो भारतीय प्रवासी अडकून पडले आहेत. तसेच, पुदुचेरीतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करून सगळ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
दितवा चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर देखील जाणवणार आहे. डिसेंबर महिन्याच्या मध्यात तळकोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये तुरळक जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज आहे. चक्रीवादळामुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.