पंजाब डख अंदाज ; राज्यात ढगाळ वातावरण, पण पावसाची चिंता नाही! शेतकऱ्यांकडून आलेल्या विचारणांवर आधारित, हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी येत्या काही दिवसांसाठी 1 ते 3 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रातील हवामानाचा सविस्तर अंदाज व्यक्त केला आहे. सध्या आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक आणि केरळच्या पट्ट्यात ‘दितवा’ नावाचे एक चक्रीवादळ घोंगावत आहे. हे चक्रीवादळ छत्तीसगडच्या दिशेने सरकणार असल्यामुळे, त्याचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम जाणवणार नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी पावसाची कोणतीही चिंता करण्याची गरज नाही.
महाराष्ट्रामध्ये पाऊस येणार नसला तरी, या काळात फक्त ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. पुढील तीन दिवसांमध्ये राज्यात चांगले ढगाळ वातावरण असेल. मराठवाड्यातील लोकांना आभाळ आल्यामुळे पाऊस येणार का, अशी शंका येऊ शकते; पण प्रत्यक्षात पाऊस येणार नाही. द्राक्ष बागायतदारांनाही सध्या पावसाचे कोणतेही वातावरण नसल्याने काळजी करण्याची आवश्यकता नाही, फक्त ढगाळ वातावरण राहील.
हे ढगाळ वातावरण असल्यामुळे राज्यामध्ये धुकं आणि धुरळी (धुरकट हवा) राहील, असा अंदाज आहे. पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये, विशेषत: चंद्रपूर, यवतमाळ आणि नागपूरच्या पट्ट्यात ढगाळ वातावरण जरा जास्त राहील. या जिल्ह्यांमध्ये दोन-तीन ठिकाणी पावसाचे तुरळक थेंब पडलेले दिसू शकतात. मात्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उर्वरित विदर्भात कुठेही मोठा पाऊस पडणार नाही.
उत्तरेकडून वारे सुरू होत असल्यामुळे, राज्यातील ढगाळ वातावरण निवळल्यानंतर थंडीला पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता आहे. सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी पावसाची चिंता करू नये. डाळिंब आणि वेलवर्गीय पिकांच्या शेतकऱ्यांनी देखील हा अंदाज लक्षात घ्यावा. राज्यातील एकूण हवामान कोरडेच राहणार आहे, फक्त ढगाळ वातावरण खूप राहील; त्यामुळे पाऊस येणार की काय, अशी परिस्थिती निर्माण होईल, पण प्रत्यक्षात पाऊस पडणार नाही.
ज्या शेतकऱ्यांनी हरभऱ्याची पेरणी करून 15 ते 20 दिवस झाले असतील, त्यांनी लगेच पाणी देणे सुरू करावे. सुरुवातीला ओल जमिनीमध्ये जाईपर्यंत पुरेसे पाणी दिल्यास हरभरा पीक चांगले जोमात येईल. राज्यात पाऊस येणार नसल्यामुळे वीट उत्पादक आणि ऊसतोड कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण त्यांचे व्यवसाय सुरळीत चालणार आहेत.